क्रीडामंत्री कबड्डी खेळले अन् खेळाडूंचा उत्साह वाढला

पुणे [] कबड्डी, टेबल टेनीस, लगोर, नेमबाजी या सारख्या आवडीच्या खेळांचा आस्वाद घेताना क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनाही “बस पाच मिनीट और”… म्हणण्याचा मोह आवरला नाही. निमित्त होते खेलो इंडिया स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे (एन.वाय.सी.एस.) आयोजित इंडिया का खेलोत्सव उपक्रमाच्या भेटीचे.

महाळुंगे-बालेवाडी येथे युवकांसाठी  राष्ट्रीय स्तरावरील “खेलो इंडिया 2019” स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेच्या ठिकाणी मुलांना खेळा विषयी आवड निर्माण व्हावी, क्रीडा क्षेत्रातील करीअरची ओळख व्हावी यासाठी खेलोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली.

यावेळी विनोद तावडे यांनी कबड्डी, टेबल टेनीस, लगोर आणि नेमबाजी या खेळाचा आनंद घेतला. तसेच रिले धावणे, वॉल क्लायंबींग, तिरंदाजी,फुटबॉल या खेळांच्या मैदानावर जाऊन त्यासंबंधी माहिती घेतली.  खेळ खेळण्यासाठी आलेल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करा. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेथे उपस्थित असलेल्या क्रीडा प्रशिक्षकांनी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

या ठिकाणी आलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांशी श्री.तावडे यांनी संवाद साधला. खेलो इंडिया बघून काय वाटते, कोणते खेळ खेळायला आवडतात.. यांसारखे प्रश्न विचारून श्री.तावडे यांनी मुलांशी संवाद साधला. खेलोत्सवात लावलेल्या प्रत्येक स्टॉलला जाऊन क्रीडामंत्री श्री.तावडे यांनी माहिती घेतली. खेलोत्सवाच्या मैदानावर बराच वेळ रमलेल्या क्रीडा मंत्र्यांनाही या निमित्त “बस पाच मिनीट और”… म्हणण्याचा मोह आवरला नाही.

 

ताज्या बातम्या