डॉ. म्हैसेकर यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियमित नियुक्ती

पुणे [] पुणे विभागाचे प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची सचिवपदी पदोन्नती झाली असून पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तपदी त्यांची नियमित नियुक्ती झाली आहे.

मे 2018 रोजी डॉ. दीपक म्हैसेकर यांची पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली होती, तेव्हापासून त्यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

या कालावधीत डॉ. म्हैसेकर यांनी प्रत्येक बाबींचा प्रकरणनिहाय आढावा घेऊन कामाला गती दिली. त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पालखी मार्ग व पालखी तळ विकासाच्या कामांना गती दिली. मेट्रो प्रकल्प जमीन अधीग्रहण, पुरंदर विमानतळ या महत्त्वाच्या कामांना त्यांनी गती दिली.

डॉ. म्हैसेकर हे पशुवैद्यक शास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक असून या विषयात त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवीही प्राप्त केली आहे. २००३ सालच्या तुकडीचे ते आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात नांदेडला पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनात देशात दुसरा क्रमांक मिळला. तसेच राज्यस्तरीय ‘गाडगे महाराज स्वच्छता अभियाना’त पहिला क्रमांक मिळाला. तसेच बेसिक सर्व्हिस टू अर्बन पुअर (बीएसयूपी) अभियानांतर्गत झोपडपट्टीमुक्तीसाठी केलेल्या कामाला त्यांच्या कारकीर्दीतच देशपातळीवरील पहिला पुरस्कार नांदेड महानगरपालिकेला मिळाला होता.

डॉ. म्हैसेकर यांच्या कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कार्यकाळात कोल्हापूरला यशवंत पंचायत राजचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांनी तीन वर्षाच्या चंद्रपूर जिल्हाधिकारी पदाच्या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. तसेच पुणे येथे येण्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासचे ते सभापती होते. या काळातही त्यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले होते.

उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. म्हैसेकर यांना वाचनाची आवड आहे.

 

ताज्या बातम्या