टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेपासून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे []  टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या निमित्त जगजेत्ते खेळाडू या ठिकाणी आले आहेत. या स्पर्धेपासून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळूंगे – बालेवाडी येथे एटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, आमदार सर्वश्री लक्ष्मण जगताप, संजय उर्फ बाळा भेगडे, भीमराव तापकीर, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, सकाळ समूहाचे अभिजीत पवार उपस्थित होते.

पुण्यासारख्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील नामांकित खेळाडू या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे टेनिसप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. तसेच यानिमित्त जगजेत्त्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नवोदित खेळाडूंना मिळणार आहे. त्यातून ते निश्चित प्रेरणा घेतील. अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन होण्याची आवश्यकता असून या टेनिस मैदानातून भविष्यातील चॅम्पियन निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

ताज्या बातम्या