गोवर- रुबेला लसीकरणः सुदृढ बालपणाची पायाभरणी

केंद्र शासनाने गोवर रुबेला अर्थात मिझेल्स रुबेला (एमआर) एकत्रित लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. स्वास्थ्य मंत्रालय, युनिसेफ यांच्यावतीने ही मोहीम राबविली जात आहे. भारतातील सर्व राज्यांमध्ये एमआर लसीकरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 27 तारखेपासून महाराष्ट्रात ही मोहीम सुरू झाली आहे. एमआर मोहिमेद्वारे यापूर्वी गोवर, एमआर, एमएमआर लस घेतलेली असली तरी 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. बालकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या आजारांवर प्रतिबंधात्मक लसीकरण हाच उपाय आहे. त्यामुळे बालकांचे आरोग्य चांगले राखून सुदृढ बालपण जपण्यासाठी गोवर-रुबेला लसीकरण आवश्यक आहे. शासन ते विनामूल्य उपलब्ध करुन देत आहे. त्याअनुषंगाने गोवर अर्थात मिजेल्स आणि रुबेला या आजारांबद्दल माहिती करु घेऊया.

गोवर- गोवर हा प्राणघातक आजार आहे आणि बालकांमधील शारिरीक दुबळेपणा अथवा बालमृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रोगप्रतिकार शक्तीचे कमी प्रमाण असलेल्या व्यक्ती, कुपोषित बालके आणि ‘अ’ जीवनसत्वाची कमतरता असलेल्या व्यक्ती यांना हा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. हा संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रसार संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या खोकण्याद्वारे आणि शिंकण्याद्वारे होतो. गोवरमुळे बालकाला न्युमोनिया, अतिसार आणि मेंदूला झालेला संसर्ग यासारख्या प्राणघातक समस्यांची बाधा होण्याची दाट शक्यता असते. लहान वयाच्या बालकांसाठी (5 वर्षाखालील) आणि प्रौढांसाठी (20 वर्षावरील ) गोवर हा अतिशय गंभीर आजार असून नंतर अतिसार, न्युमोनिया तसेच मेंदूला झालेला संसर्ग यासारख्या उद्भवणाऱ्या समस्यांचा परिणाम मृत्यू होण्यात होऊ शकतो. गोवरसंबंधित असलेले 60 टक्के मृत्यू अतिसार, न्युमोनिया आणि मेंदूदाह (मेंदूला झालेला संसर्ग) या गुंतागुंतीमुळे होतात.

रुबेला- जेव्हा संसर्ग झालेल्या व्यक्ती शिंकते अथवा खोकते तेव्हा त्यातून उडालेले थेंब हवेत पसरुन रुबेलाचा फैलाव होतो. हा विषाणू गर्भवती महिलांकडून त्यांच्या गर्भापर्यंत पोचण्याची शक्यता असते. लसीकरण न झालेली बालके अथवा प्रौढ व्यक्ती जे सीआरएस रुबेलाची लागण झालेली अर्भकाच्या संपर्कात येतात त्यांनाच हा धोका जास्त असू शकतो. सीआरएस झालेली बालके कर्णबधीरता, अंधत्व, हृदयातील दोष आणि अन्य प्रकारच्या आजन्म शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त असू शकतात. जर एखाद्या गर्भवती महिलेला गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झाला तर त्याची निष्पती कॉनजनायटल रुबेला सिंड्रोममध्ये (सीआरएस) होऊ शकते. त्यामुळे गर्भ आणि नवजात शिशूवर गंभीर आणि कदाचित प्राणघातक परिणाम होऊ शकतात. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रुबेलाचा संसर्ग झालेल्या महिलांच्या नवजात असुरक्षित बालकांना डोळे (काचबिंदू, मोतीबिंदू), कान (बहिरेपणा), मेंदू (मायक्रोसेफेली वा छोटे डोके असणे (मतिमंदत्व)आणि हृदयातील दोष यासारख्या दीर्घकालीन जन्मजात विकृती होण्याची दाट शक्यता असते. रुबेलामुळे गर्भपात होणे, अकाली प्रसूती होणे आणि मृत बालक जन्माला येणे हेदेखील होऊ शकते.

लक्षणेः- गोवर- खूप ताप, लालसर पुरळ, खोकला, नाकातून वाहणारे पाणी आणि लाल झालेले डोळे ही गोवरची सामान्यपणे ओळखता येणारी लक्षणे आहेत. साधारणपणे बालकांमध्ये हा रोग सौम्य स्वरुपात असतो. गोवरचा संसर्ग झाल्यावर त्याची लक्षणे दिसू लागतात आणि सामान्यपणे ते लक्षण म्हणजे ताप येणे. ताप सुरु झाल्यावर अंदाजे 2 ते 3 दिवसांनी अंगावर गोवरचा पुरळ दिसू लागतो.

लक्षणे- रुबेला- पुरळ, सौम्य ताप, मळमळणे आणि सौम्य स्वरुपातील डोळे येणे ही रुबेलाची लक्षणे आहेत. कानाच्या मागे आणि मानेमध्ये सुजलेल्या लसिकाग्रंथी हे रुबेलाचे प्रमुख लक्षण आहे. संसर्ग झालेल्या प्रौढांमध्ये, विशेषत: महिलांमध्ये संधिवात आणि सांधेदुखीचा त्रास वाढीला लागू शकतो. एखाद्या व्यक्तीला रुबेलाचा संसर्ग झाल्यावर सुमारे 5 ते 7 दिवसांत रुबेलाचा विषाणू संपूर्ण शरीरात पसरतो. संसर्ग झाल्यावर साधारणपणे 2 ते 3 आठवड्यांनी रोगाची लक्षणे दिसू लागतात. संसर्ग होण्याची सर्वात जास्त शक्यता साधारणपणे अंगावर पुरळ दिसून आल्यावर 1 ते 5 दिवस असते. परंतु पुरळ दिसू लागण्याच्या 7 दिवस आधी ते पुरळ कमी झाल्यानंतर 7 दिवस या काळातही रुबेलाचा संसर्ग होऊ शकतो.

उपचार- गोवर अथवा रुबेलासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. गोवर झालेल्या व्यक्तीने भरपूर विश्रांती घेणे, द्रवपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे आणि तापाचा उपचार करणे गरजेचे असते. गोवरचे निदान झाल्यावर रुग्णाने त्वरीत लागोपाठ दोन दिवस ‘अ’ जीवनसत्वाचे दोन डोस घेतले पाहिजेत.

गोवर-रुबेला (एमआर) मोहीम

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महाराष्ट्रामध्ये गोवर रुबेला लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान राज्यातील 9 महिने पूर्ण केलेल्या ते 15 वर्षे वय असणाऱ्या सर्व बालकांना एमआर लसीचा डोस देण्यात येत आहे. यामध्ये गोवर, एमआर, एमएमआरचे यापूर्वी लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण न झालेल्या बालकांचा समावेश असणार आहे. एमआर मोहिमेचा हेतू गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होऊ नये म्हणून बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, गोवरमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण आणि सीआरएसचे संभाव्य रुग्ण कमी करणे आणि जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करुन ठराविक वयोगटाच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करणे हा आहे. लसीकरणासाठी कुपोषित बालकांना प्राधान्य द्यावे कारण अशा बालकांमध्ये अतिसार आणि न्युमोनियासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. श्वसनाचा सौम्य रुबेलाचे बहुसंख्य रुग्ण 15 वर्षाखालील बालके असल्याचे आढळून आल्याने मोहिमेमध्ये या वयोगटावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

लसीकरण कुठे?

केवळ ठराविक ठिकाणी, घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या 2-3 आठवड्यांमध्ये शाळेत न जाणारी तसेच लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण ठराविक सार्वजनिक ठिकाणी (बाह्यसंपर्क सत्रे) तसेच गावांत आणि शहरी भागात फिरत्या पथकाद्वारे करण्यात येईल.

रॅपिड कन्व्हिनिअन्स मॉनिटरिंग दरम्यान कोणत्याही ठिकाणी 4 अथवा 4 पेक्षा कमी बालकांचे लसीकरण राहून गेले असल्याचे आढळून आले तर एमआर मोहिमेच्या चौथ्या आठवड्यात त्या भागातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा समावेश करण्यासाठी एमआर लसीकरण सत्राची पुन्हा अंमलबजावणी केली जाईल.

इंजेक्शनद्वारे लसीकरण

हे लसीकरण पुर्णतः विनामूल्य आहे. ही लस उजव्या हाताच्या दंडावर अध:त्वचेखाली इंजेक्शनद्वारे दिली जाते. लसीकरणानंतर 7 ते 12 दिवसांनी काही बालकांना या लसीमुळे सौम्य ताप अथवा हलका पुरळ येऊ शकतो.
मार्गदर्शक तत्वानुसार मोहिमेअंतर्गत देण्यात येणारा डोस द्यायची वेळ झाली असेल तर बालकाच्या शेवटच्या नियमित लसीकरणानंतर कितीही कालावधी लोटला असला तरी तो डोस त्याला देण्यात येईल कारण ही मोहीम एकदाच आयोजित केली जाणार असून अतिरिक्त डोस दिल्याने बालकाला कोणतीही हानी होणार नाही.

मोहिमेअंतर्गत या बालकाचे एमआर डोस देऊनही लसीकरण केले पाहिजे, अतिरिक्त डोस दिल्यामुळे दुष्परिणाम होण्याचा कोणताही धोका नाही. त्याखेरीज 16 ते 24 महिन्यांच्या बालकाला एमआर लसीचा 2 रा नियमित डोस देण्यासाठी आणले पाहिजे. तसेच मासिक पाळी चालू असलेल्या बालिकांचे लसीकरण करणे हानिकारक नाही.

गोवर व रुबेला आजाराविषयी महत्वाची वस्तुस्थिती

1) भारतामध्ये दरवर्षी सुमारे 49200 बालके गोवरच्या संसर्गाने मृत्यूमुखी पडतात.
2) गोवर आणि रुबेला संसर्गजन्य रोग आहेत आणि ते विषाणूमुळे होतात. त्याचा संसर्ग प्रामुख्याने खोकणे आणि शिंकणे या क्रियेद्वारे हेवत उडालेल्या थेंबामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो.
3) गोवर झालेल्या व्यक्तीपासून इतरांना होणारा संसर्ग रुग्णांच्या अंगावर पुरळ दिसून येण्याआधीचे 4 दिवस ते पुरळ कमी झाल्यानंतरचे 4 दिवस या कालावधीत होतो. रुबेला झालेल्या व्यक्तीपासून इतरांना होणारा संसर्ग रुग्णांच्या अंगावर पुरळ दिसून येण्याआधी 7 दिवस ते पुरळ दिसू लागल्यानंतर 7 दिवस या कालावधीत होतो.
4) गोवरमुळे अतिसार, न्युमोनिया, तोंडातील जखमा (अल्सर) कानातील संसर्ग, डोळ्यांची हानी होणे, मेंदूला झालेला संसर्ग यासारख्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात तसेच पुढे मृत्यूदेखील होऊ शकतो.
5) गर्भावस्थेत झालेल्या रुबेलाच्या संसर्गामुळे गर्भपात होणे, मृत बालक जन्माला येणे तसेच नवजात शिशुला अंधत्व, बहिरेपणा, हृदयातील दोष (कॉनजनायटल रुबेला सिंड्रोम ) होऊ शकतात.
6) लसीकरण न झालेल्या बालकांना गोवर अथवा रुबेलाचा संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
7) लसीकरण हा गोवर व रुबेला सीआरएमसारख्या आजारांचा प्रतिबंध करण्याचा एकमेव उपाय आहे. केंद्र सरकार मोहीम तसेच नियमित लसीकरणाच्या माध्यमातून एमआर लस विनामूल्य उपलब्ध करुन देत आहे.
8) वेळापत्रकानुसार नियमित लसीकरण चालूच ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published.